रंग झाला फिका अन् कोणी देईना मुका.. यांसारख्या भन्नाट म्हणींमुळे ‘देवमाणूस’ या मालिकेतील सरु आजी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत.
मालिकेत काम करणाऱ्या सरु आजींनी जुन्या म्हणींना पुन्हा वैभव प्राप्त करुन दिलंय. सरु आजीची भूमिका साकारणाऱ्या रुक्मिणी सुतार या ७० वर्षांच्या आहेत. त्यांनी याआधी अनेक मालिकांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या आहेत.
अभिनय क्षेत्रात जवळपास गेल्या दहा वर्षांपासून त्या काम करत आहेत. पण ‘देवमाणूस’ या मालिकेतील सरु आजींच्या भूमिकेमुळे त्या प्रकाशझोतात आल्या आहेत.
याआधी त्यांनी मिसेस मुख्यमंत्री, लागीरं झालं जी, दुर्गा यांसारख्या मालिका तर जाऊ द्या ना बाळासाहेब, बघतोस काय मुजरा कर, होम स्वीट होम, पोशिंदा, पहिली शेर दुसरी सव्वाशेर यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी रुक्मिणी आजी सिंचन विभागात नोकरी करायच्या. त्यावेळी सुट्टीच्या दिवशी कुटुंबीयांपासून, पतीपासून लपूनछपून त्या नाटकात भाग घ्यायच्या.
या आजींनी ‘दबंग’ चित्रपटात सलमान खानसोबतही भूमिका साकारली आहे. या आजींनी ‘दबंग’ चित्रपटात सलमान खानसोबतही भूमिका साकारली आहे. वयाच्या सत्तराव्या वर्षीही काम करण्यासाठी त्यांच्यात असलेली ऊर्जा ही तरुणांनाही लाजवणारी आहे.