‘बिग बॉस’ची उपविजेती आणि सलमान खानची सह-अभिनेत्री सना खानने (Sana Khan) आपल्या अदांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. ‘बिग बॉस’ गाजवल्यानंतर ती सलमानसह ‘जय हो’ या चित्रपटात झळकली होती. मात्र, एका पोस्टमुळे आता तिच्या चाहत्यावर्गाला चांगलाच धक्का बसला आहे.
अभिनेत्री सना खानने चित्रपट सृष्टीला (Film Industry) ‘अलविदा’ म्हणत, धर्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहीत तिने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत सनाने (Sana Khan) म्हटले की, ‘सगळ्या बंधू-भगिनींना माझी विनंती आहे की, यापुढे चित्रपट सृष्टीत कुठल्याही कामासाठी मला बोलवण्यात येऊ नये. आतापर्यंतच्या सहकार्यासाठी खूप खूप आभार’.
सनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याचबरोबर तिचे नाराज चाहते कमेंट्स करून प्रश्न विचारत आहेत. तिने असा निर्णय का घेतला याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. यावरही तिने उत्तर दिले आहे.
‘हे आयुष्य प्रत्यक्षात मृत्यूनंतरचे जीवन सुधारण्यासाठी आहे. आणि जेव्हा माणूस विधात्याच्या आज्ञेनुसार जगेल तेव्हा, त्याचे जीवन अधिक चांगले होईल. केवळ संपत्ती जमवणे याला जीवनाचे उद्दिष्ट बनवू नका. आपले ध्येय सिद्ध करा. मानवतेचे रक्षण करा.
म्हणूनच, आज मी जाहीर करते की, आजपासून मी माझे ‘शोबीज’ (चित्रपट उद्योग) जीवन सोडणार आहे आणि माझ्या विधात्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा निश्चय करणार आहे,’ असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सना खान अभिनयासोबतच उत्तम नृत्यदेखील करते. याशिवाय ती मॉडेलिंगदेखील करायची. फॅशन लूक आणि अभिनय कौशल्य यामुळे फार कमी वेळात तिने चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान मिळवले होते. तिने 50 हून अधिक जाहिरातींमध्ये काम केले आहे.
सनाने 2005 मध्ये ‘ये है हाय सोसायटी’ या चित्रपटाद्वारे फिल्मी करिअरची सुरूवात केली होती. यानंतर ती प्रसिद्ध शो ‘बिग बॉस’च्या 6व्या पर्वात दिसली होती. याच कार्यक्रमामुळे तिला सलमान खानचा ‘जय हो’ चित्रपटदेखील मिळाला होता. यानंतर ती चित्रपट सृष्टीतून गायब झाली होती. आता तिने पोस्ट करत चित्रपट सृष्टी सोडत असल्याचे जाहीर केले आहे.