भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी या नावाने संबोधले जाते. या दिवशी शयन अवस्थेत लीन असलेल्या श्रीविष्णूंची अनंत स्वरुपात पूजा केली जाते. याच दिवशी गणेशोत्सवाची सांगता करत गणपती मूर्तींचे विसर्जन केले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होऊन पार्थिक गणपती पूजन केले जाते. पुढील १० दिवस कुळाचाराप्रमाणे विधिपूर्वक गणेशाचे यथासांग मनोभावे पूजन केले जाते. यानंतर अनंत चतुर्दशीला गणपती मूर्तींचे योग्य मुहुर्तावर विसर्जन केले जाते.
सन २०२१ मध्ये रविवार, १९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जन केले जाईल. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, अशा जयघोषात भक्तिमय वातावरणात आणि जड अंतःकरणाने गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. आपापल्या परंपरांप्रमाणे काही ठिकाणी दीड दिवस, पाच दिवस, गौरी-गणपती, सात दिवस गणपती पूजन केले जाते. तर, अनेक ठिकाणी संपूर्ण १० दिवस गणपतीची सेवा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप दिला जातो.
गणपती विसर्जन
देवी-देवतांच्या मूर्तींचे जलात विसर्जन करण्याची प्राचीन परंपरा आहे. शास्त्रांमध्ये देवी-देवतांच्या मूर्तींचे पवित्र जलाशयांत विसर्जन करावे, असे सांगितले जाते. यासाठी समुद्र, नदी, तलाव, कुंड यांना प्राथमिकता देण्यात आली आहे. समुद्राला पाण्याचा राजा मानले जाते. यात अनेक नद्यांचे प्रवाह समाविष्ट झालेले असतात.
म्हणूनच गणपती वा देवी-देवतांच्या मूर्तींचे समुद्रात विसर्जन करावे, असा सल्ला दिला जातो. यानंतर नद्यांना प्राथमिकता देण्यात आली आहे. देशावर असलेल्या करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता बघता गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे सर्वांची सुरक्षितता लक्षात घेऊन शक्य असल्यास घरच्या घरी गणपती मूर्तीचे विसर्जन करावे.
अनंत चतुर्दशी तिथी प्रारंभ : १९ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजून ५९ मिनिटे
अनंत चतुर्दशी तिथी समाप्ती : २० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजून २८ मिनिटे.